नाशिक: मुलांना आजपासून शहरात जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम
नाशिक (प्रतिनिधी): शहरात २५ ते २९ एप्रिलपर्यंत १ ते १९ वयोगटातील २ लाख ५६ हजार २५८ मुलांना अल्बेंडेझॉलच्या जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.
पालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो.
कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे.
ही बाब लक्षात घेऊन १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर गोळी देण्यात येईल.
ही मोहीम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. १ ते २ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी २०० मिलिग्रॅमची गोळी चुरा/पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. २ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना चुरा अथवा तुकडे करून चाऊन खाण्यास पाण्याबरोबर देण्यात यईल. अल्बेंडेझॉलची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. जे मुले शाळेत जात नाहीत, अशांना आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन गोळ्या वाटप केल्या जातील.