नाशिक (प्रतिनिधी): इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चौथी विशेष फेरी अंतिम फेरी असल्याचे शिक्षण विभागातर्फे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी बुधवार (ता. २३) पर्यंत मुदत असणार आहे.
तर शनिवारी (ता.२६) गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
याअंतर्गत यापूर्वी तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरीदेखील जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे चौथी विशेष प्रवेश फेरी राबविली जात आहे.
यापूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करणे, तर नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरून प्राधान्यक्रम व महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची संधी उपलब्ध असेल. त्यासाठी बुधवारपर्यंत मुदत दिलेली आहे.
अवघ्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली असून, रिक्त जागांची संख्या सुमारे दहा हजार इतकी आहे. फेरीसाठी शनिवारी (ता. २६) गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाणार आहे.