नाशिक (प्रतिनिधी): कीटकनाशक कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट विक्रीसाठी उत्तर प्रदेशात नेमलेल्या विक्री अधिकाऱ्यानेच कीटकनाशक मालासह लॅपटॉप व मोबाईल यांचा अपहार करीत कंपनीलाच तीन लाख ९३ हजार ५३७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेककुमार कैलासनाथ त्रिपाठी (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे संशयित विक्री अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक येथील एका कीटकनाशक कंपनीचे वसुली व्यवस्थापक प्रशांत रमेश चव्हाण (रा. सोमनाथ पार्क, दिंडोरी रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, कंपनीच्या कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी उत्तर प्रदेशात विक्री अधिकारी नेमायचा होता.
त्यासाठी कंपनीने २० जानेवारी २०१७ ला संशयित त्रिपाठी यांस अटी-शर्तींसह नियुक्तिपत्र देत विक्री अधिकारी पदावर नेमले. कामासाठी संस्थेने त्याला लॅपटॉप, मोबाईल आणि कंपनीच्या प्रचाराचे साहित्य दिले होते.
काही दिवस व्यवस्थित काम केल्यानंतर त्रिपाठीने कामात घोळ करण्यास सुरवात केली. उत्तर प्रदेशातील कासमंडीतील एका दुकानदाराने तीन लाखांचा माल संस्थेला परत करण्यासाठी दिला.
माल व पैसे त्रिपाठीने संस्थेकडे पाठविले नाहीत. त्याचप्रमाणे, सरोजनीनगर येथील एका दुकानाचेही ९३ हजारांच्या मालाबाबतही तेच केले. याबाबत संस्थेने त्रिपाठी याच्याकडे विचारणा केली असता, काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे देईल, असे सांगितले.
२०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर संस्थेने त्याला वेळोवेळी विचारणा करूनही त्याने पैसे व साहित्य परत केले नाही. त्यामुळे संस्थेतर्फे पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिस तपास करीत आहेत.