नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर नाशिक विमानतळाला दोन महिन्यांपूर्वी इंटरनॅशनल कुरियर हब सेवेसाठी मान्यता मिळाली आहे.यामुळे देशातून येणाऱ्या पार्सलचा मार्ग आता मोकळा झाला असून, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता नाशिक शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे हे दिसून येते.
ओझरला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळे गेल्या ९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे हवाई उड्डाण मंत्रालयात एक विशेष बैठक झाली. त्याप्रसंगी खासदार गोडसे यांनी नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणे किती महत्त्वाचे आहे हे अधिकाऱ्यांना सांगितले. म्हणून याची दखल घेत विमानतळाशी सलंग्न असलेल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.७ ऑक्टोबर) रोजी ओझर विमानतळाला भेट दिली. यादरम्यान उपलब्ध सुविधांची पाहणी केली असून, पथकाने विमानतळ प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या. या दौऱ्यामुळे ओझर विमानतळाला लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्याचे संकेत दिसत आहेत.
या पाहणी दौऱ्याच्या पथकात ब्युरो ऑफ इमिग्रीनेशनचे जॉइंट डायरेक्टर पाठक, कस्टम विभागाचे चौधरी, एनआयसीचे मते, हॅलकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर सेन व एचएएल विभागाचे उच्च पदस्थ अधिकार्यांचा समावेश होता.पाहणी पथकाने आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी आवश्यक सेवा व सुविधांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना देखील दिल्या. या सुविधा पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेनंतर ओझर येथून आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकअप आणि लॅडिंग होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.