नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील गंगापूररोड येथील एका बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याने संधी साधत, एका चोरट्याने स्वयंपाकघरातील १० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे चोरली. या चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले असून, ५ लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटेही हस्तगत केली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सुरभी देशमुख (वय ३७, रा. मधुर रेसिडेन्सी, गंगापूररोड) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा एका चोरट्याने गैरफायदा घेतला. दरम्यान, रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) रोजी १० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे चोरून पळ काढला. त्यामुळे या तक्रारीसंदर्भात गुप्त माहितीच्या आधारे मोरे मळा परिसरात गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापळा रचला. दरम्यान पोलिसांचे वाहन असल्याचे ओळखून एक युवक पळू लागला. त्याला पकडले असता निवृत्ती भीमराव बुरुंज (वय,३० रा.गवारे मळा, हनुमानवाडी) असे त्याने आपले नाव सांगितले. त्याचप्रमाणे, त्याने सोन्याची बिस्किटे चोरल्याची कबुलीही दिली. दरम्यान पोलिसांनी निवृत्तीने सराफ बाजारात विकलेली सोन्याची बिस्किटे हस्तगत केली.