ह्रदयद्रावक! नाशिकला 7 महिन्यांच्या गर्भवतीचा चक्कर आल्याने मृत्यू; जुळ्या बाळांना देणार होत्या जन्म
नाशिक (प्रतिनिधी): काल (दि. १० फेब्रुवारी) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा भागात डॉक्टरांकडे जाताना चक्कर येऊन पडल्याने पूजा देवेंद्र मोराणकर (४५) या गर्भवती मातेचा गर्भातील जुळ्यांसह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या महिलेला सुमारे 21 वर्षानंतर मातृत्वाचा योग आला होता असे समजते,त्यामुळे रात्री साडे नऊ वाजता निघालेल्या अंत्ययात्रे प्रसंगी परिसरातील नागरिक भावूक झाले होते.
विक्रीकर भवन जवळ असलेल्या आनंदनगर येथील गजानन आर्केड या इमारतीमध्ये मोराणकर कुटुंबीय राहते. श्री मोराणकर अंबड येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते .अनेक वर्षानंतर सौ. पूजा यांना मातृत्वाची चाहूल लागल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते.
- नाशिक: अपघाताचे सत्र सुरुच; दोन अपघातांमध्ये एका बस प्रवाशासह दुचाकीस्वाराचा मृत्यू
- नाशिक: भरधाव मालट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला ठार
त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे वडील रमेश पाखले आणि बहिण देखील येथे आले होते. नियमितपणे स्त्री रोग तज्ञांकडून त्यांच्या तपासणी देखील सुरू होत्या. त्यात जुळ्यांचा योग असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
साडेसात महिन्याच्या त्या गर्भवती होत्या असे समजते.आज दुपारी त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने त्या बहीण आणि वडिलांसह इमारतीच्या खाली आल्या. समोरून रस्ता ओलांडून पलीकडे जाऊन डॉक्टरकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभ्या होत्या.
अचानक त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या. तातडीने त्यांना पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .तेथे डॉक्टरांनी त्यांच्यासह गर्भातील जुळे देखील मृत झाल्याचे घोषित केल्याने मोरानकर आणि पाखले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वत्र ही बातमी कळल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली .रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.