नाशिक (प्रतिनिधी) : जानेवारी महिन्याची ओळख ही कडाक्याची थंडी पडणारा महिना अशी आहे. मात्र, दहा दिवसांपूर्वी किमान तापमानाचा किमान पारा थेट १८.४ वर पोहचला होता. शहराचे तापमान वाढले होते. परंतु, आता ४ दिवसांपासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून बुधवारनंतर थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गतवर्षी नाशिकमध्ये १७ जानेवारी रोजी ४ अंशांपर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला होता. परंतु, यावर्षी रविवारी १७ जानेवारी रोजी १६.४ किमान तापमान नोंदविले गेले आहे. यामध्ये मोठा फरक असून, काही दिवसांमध्ये थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणारे वारे थंड आहेत तर या वाऱ्यांचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून, दिल्लीकडून वारे मध्यप्रदेश व महाराष्ट्रात येतात. उत्तरेचे थंड वारे व रात्री दक्षिण पूर्वेकडील वाहणारे वारे यांच्यामुळे थंडी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार, बुधवारी २० जानेवारीनंतर थंडीची तीव्रता नाशिककरांना लवकरच जाणवणार आहे.
तर, काही दिवसांपासून, दिवसा आकाश निरभ्र दिसते व संध्याकाळ उलटल्यानंतर, रात्रभर ढग दाटून येतात. यांनतर, पारा घसरायला पाहिजे पण, याउलट पारा वाढतो. तर, पुढील दिवसांमध्ये हवामानही बदलेल व जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा कडाक्याच्या थंडीची अनुभूती देऊन जाईल असा अंदाज आहे.