सिटीलिंकतर्फे आजपासून विद्यार्थ्यांसाठी पास वितरण केंद्राची सेवा
नाशिक (प्रतिनिधी): पालिकेने सुरू केलेल्या शहर बससेवेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या बससेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी शहरातील ठिकठिकाणी पास वितरण केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.
अनलाॅकनंतर आता टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये खुली करण्यास राज्य शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली आहे. या विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने सिटीलिंकच्या वतीने नियाेजन करण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांना सवलतीचा पास देण्यात येत हाेता.त्याच प्रमाणे सिटीलिंकच्या बसेसमध्येही सवलतीच्या भाडेदरात विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. यासाठी साेमवार दि. १८ पासून हुतात्मा अंतन कान्हेरे मैदानाजवळ असलेले सिटीलिंकचे कार्यालय तसेच जर्नादन स्वामी मठाजवळ असलेल्या तपाेवन डेपाे येथे विद्यार्थ्यांसाठी पास वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने या पास वितरण केंद्राच्या संख्येत देखील वाढ केली जाणार असल्याची माहिती सिटीलिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.