नाशिक: जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील सावकी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
येथील एका कुटुंबातील दोन जणांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला आहे.
आजेसासूवर अंत्यसंस्कार करून घरी परतलेल्या विवाहितेवर देखील काळाने घाला घातला आहे.
कपडे वाळत घालताना वीजेचा धक्का बसल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
काही तासांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
आकांक्षा कचवे असं मृत पावलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. आकांक्षा यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी देवळा तालुक्यातील सावकी येथील कचवे कुटुंबात झाला होता. घटनेच्या दिवशी आकांक्षा यांच्या आजेसासूचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं. कुटुंबातील सदस्यांनी, गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मृत आकांक्षा या देखील आपल्या आजेसासूच्या अंत्यसंस्काराला गेल्या होता.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10301,10298,10291″]
अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर आकांक्षा यांच्या घरी अनेक नातेवाईक आले होते. कुटुंबातील सर्वांनी घरी आल्यानंतर आंघोळी केल्या. त्यानंतर घरातील सदस्यांचे कपडे धुतल्यानंतर आकांक्षा कपडे वाळत घालायला तारेकडे गेल्या. पण कपडे वाळत घालण्याच्या तारेत वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार झटका बसला. यातच त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला. सासूवर अंत्यसंस्कार करून आलेल्या विवाहितेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला.
कचवे कुटुंबातील ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार करून नातेवाईक अद्याप त्यांच्या घरीदेखील पोहोचले नव्हते. तोपर्यंतच कचवे कुटुंबातील अनेक एका सदस्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने नातेवाईकांना देखील धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती. एकाच घरात लागोपाठ असे दोन आघात बसल्यामुळे कचवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात नवदाम्पत्याचा संसार असा अर्ध्यावर मोडल्यानं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.