सातपूरमधील युवकाच्या खुनप्रकरणी पित्यासह दोन्ही पुत्रांना दंडासह जन्मठेपेची शिक्षा
नाशिक (प्रतिनिधी): घरगुती भांडणात पडत एका 30 वर्षीय युवकाचा खुन केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना जन्मठेपेसह दंडासह शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की 14 नोव्हेंबर 2020 रोजी सातपूरच्या हनुमान मंदिराजवळ संबलदेव यादव (वय 30) व त्याचा साला अमरजित यादव यांच्यात फटाके फोडण्याच्या कारणावरुन वाद सुरु होते.
तेव्हा शेजारी राहणारे आरोपी सुकट मोहोदर चौव्हाण (वय: ५२), संदीप सुकट चौव्हाण (वय: २२) आणि संजय सुकट चौव्हाण (वय: २५) हे त्या ठिकाणी आले.
त्यापैकी संदिप याने त्यांच्यावर ओरडून “ हल्ला, हुल्ला क्या करतो हो, आवाज बंद करो” असे त्यांना म्हणाला. यावर अमरजितने त्याला सांगितले की ‘हमारा आपस का मामला है, आप बिच में बोलनेवाले कौन हो ?’ या बोलण्याचा संदिपला राग आला. त्याने घरातून बॅट आणली. सुकट चौव्हाण याने संबलदेव यादव याला पाठीमागून धरून ठेवले आणि संदीप याने बॅटने मारले. याचवेळी संदिपचा भाऊ संजय याने दुसरी बॅट आणून त्याच्या संबलदेवच्या डाव्या डोळ्यावर मारल्याने तो चक्कर येऊन खाली पडला. या प्रकारानंतर आरोपी पळून गेले.
- नाशिक: उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय दुचाकीस्वार ठार
- नाशिक: पेठ रोडला दोन गटांत हाणामारी, दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
संबलदेवला उपचारासाठी सुखकर्ता हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र १८ नोव्हेंबर २०२० म्हणजेच घटनेच्या चार दिवसानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेनंतर संगिता संबलदेव यादव (वय 27) यांच्या फिर्यादीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक टि.एम.राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन गुन्हा उघडकिस आणला.
आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 1 चे न्यायाधिश व्हि.एस.कुलकर्णी यांनी परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.