नाशिक (प्रतिनिधी): गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन संशयित आरोपींना काही स्थानिक तरुणांनी कसारा परिसरात ८ जूनला बेदम मारहाण केली होती. मारहाणीतील तिघांपैकी एक बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती.
दरम्यान, बेपत्ता व्यक्ती इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरातील उंट दरीत मृतावस्थेत सापडली असून खुनाचा गन्हा दाखल झाला आहे. तीन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घटनेत मारहाण करणाऱ्या सहा संशयित आरोपींना इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पप्पू अतिक पड्डी (३६), अकील गुलाम गवंडी (२५), लुकमान सुलेमान अन्सारी (२५, रा. पडघा, जि. ठाणे) हे तिघे शहापूर तालुक्यातील विहीगाव येथून ८ जूनला एका टेम्पोत गोवंश घेऊन जात होते. कारेगाव येथे पिकअपमध्ये गोवंश जनावरे घेऊन साक्षीदार प्रल्हाद शंकर पगारे (रा. विहीगाव) याच्या घरासमोर थांबले होते. यावेळी कारेगावकडून १ झायलो, २ स्विफ्ट कार आणि ७ ते ८ मोटरसायकली घेऊन १५ ते २० जणांनी हा टेम्पो अडवून त्यातील तिघांना मारहाण केली.
टेम्पोतील तिघांपैकी अकील गुलाम गवंडी पळून गेला. उरलेल्या दोन जणांना व टेम्पोला या लोकांनी इगतपुरीजवळील घाटनदेवी मंदिरासमोर आणून रात्रीच्या वेळेस पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. टेम्पोतील लुकमान सुलेमान अन्सारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या उंट दरीच्या दिशेने पळाला. यानंतर या टोळक्याने टेम्पो व जखमी अतिक हर्षद पड्डी याला इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी जखमी चालकास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्या दिवशी लुकमान सुलेमान अन्सारी हा गायब असल्याची तक्रार इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. १० जून रोजी उंट दरीत लुकमानचा मृतदेह २५० फूट खोल दरीत आढळून आला. हा मृतदेह कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच तासांच्या अथक परिश्रमाने रात्रीच्या वेळी बाहेर काढला.
या खुनाच्या गुन्ह्यात पप्पू ऊर्फ प्रदीप गोपाळ आडोळे (३४, रा. मायाबाजार, घोटी, ता. इगतपुरी), भास्कर बाबूलाल भगत, (२८, रा. बलायदुरी, ता. इगतपुरी), विजय प्रभाकर भागडे (२६, रा. जोगेश्वरी, इगतपुरी), चेतन सोमनाथ सोनवणे, (२६, रा. कृष्ण मंदिराजवळ, आडवणरोड, घोटी), रूपेश रामदास जोशी (३९, रा. वासुदेव चौक, घोटी, ता इगतपुरी), बंटी ऊर्फ शेखर रामचंद्र गायकवाड (२२, रा. क्रांतीनगर घोटी, ता. इगतपुरी) या ६ संशयित आरोपींचा समावेश आहे. या घटनेत अजून काही संशयित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे समजते. गोवंशाची बेकायदा वाहतूक केली म्हणून पप्पू अतीक पड्डी (३६), अकील गुलाम गवंडी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.