नाशिक (प्रतिनिधी): शेअर बाजारात व्यवहार करून ब्रोकरेज मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रकमेद्वारे ट्रेडिंग करत त्यात नुकसान करून १३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एम. के. ग्लोबल फायनान्स सर्व्हिस कंपनी आणि एजंट बाळासाहेब रतन बागूल याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि जतीन चौहान (रा. पनवेल, रायगड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एम. के. ग्लोबल फायनान्स सर्व्हिस कंपनी (सुयोजित संकुल, शरणपूररोड) येथे डीमॅट खाते उघडले आहे. कंपनीकडून डीमॅट खाते, डीपी खाते क्रमांक देण्यात अाला. कंपनीचे एजंट बाळासाहेब बागूल याने स्वत:च्या मोबाइल नंबरवरून फोन करत केवायसी आणि डीमॅट खाते आपल्या मोबाइल क्रमांकाला लिंक करून घेतले. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेवर ०.५ टक्के स्टॉपलॉस लावत व्यवहार करण्याच्या अटीशर्ती लावत असल्याचे सांगितले. या कालावधीत कंपनीवर आणि एजंटवर विश्वास ठेवत ६५ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या रकमेतून ट्रेडिंग करत बागूल याने मोठ्या प्रमाणात ब्रोकरेज मिळविण्याच्या उद्देशाने ९ लाख ७१ हजार आणि एम. के. ग्लोबल कंपनीमध्ये ४ लाख १५ हजार असे १३ लाख ८६ हजार रकमेची नियोजनबद्ध गुंतवणूक केली. ट्रेडिंगमध्ये या सर्व रकमेचे नुकसान करत फसवणूक केली अशी तक्रार चौहान यांनी पोलिसांत दिली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.