महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या वर्तनावरून त्यांनी पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, असा युक्तीवाद ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला होता.
सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळीही 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाने आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप कसा करू शकतो? असा मुलभूत प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीमुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल, अशी शक्यता तेव्हापासून वर्तवण्यात येत होती.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली तेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं, पण आता विधानसभेला अध्यक्ष आहे, त्यामुळे हा विषय आपल्याकडे येईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत आहेत. तर नोटीस मी पाठवली असल्यामुळे याबाबतचा निर्णय मी घेईन, असा दावा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केला आहे.
या 16 आमदारांवर टांगती तलवार:
एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.