नाशिक (प्रतिनिधी): दरवर्षी शासनाच्या समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश वाटप करण्यात येतात. परंतु, यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोव्हेंबर पर्यंत सर्व शाळा बंद असल्या कारणाने शासनाने मोफत गणवेश वाटपामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला.
राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एक गणवेश खरेदीला मंजुरी दिली असून, जिल्हा परिषदेने शासनाकडे २ कोटी ४१ लाख ९४१ विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी एकूण ७ कोटी २५ लाख ८२३ रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात आले होते तेव्हा फक्त साडेपाच लाख गणवेशांसाठी तब्बल १५ लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली होती. यावर्षी एकाच गणवेशाचे वाटप होणार असल्याने उरलेल्या एका गणवेशाची किंमत वजा करूनच निधीची मागणी केली आहे.
यामुळे निधीत थेट ५० टक्के कपात होणार आहे. कोरोनामुळे शाळा सुरु होण्यावर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे परंतु, शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश मिळण्यास मंजुरी मिळाल्याने शासनासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कदाचित या महिन्या अखेरी पर्यंत शासनाकडून जिल्हा परिषदांना निधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार गणवेश खरेदीचा अधिकार ग्राम शिक्षण समितीला असणार आहे.