नाशिक (प्रतिनिधी): राणेनगरकडून अश्विननगरकडे रस्ता ओलांडत असतांना 61 वर्षीय वृद्धाला नाशिककडे भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर या घटनेतील वाहनचालक फरार झाला असून अज्ञात वाहन चालकाबाबत पोलीस तपास सुरू आहे.
गेल्या आठवड्याभरात सिडको पाथर्डी भागात झालेल्या विविध अपघातांत तिघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेजबाबदार वाहनचालकाकडून वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने हे अपघात घडल्याचं समोर आले आहे. राणेनगर जवळ मुंबई-नाशिक महामार्ग ओलांडताना झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कचरू बाळू अडसर असे अपघात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडलाय. तर अज्ञात वाहन चालकाने घटना स्थळावरून पळ काढला आहे, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
अपघात इतका भयंकर होता की यातील मयत अडसर हे २० फूट लांब फेकले गेले होते. उड्डाणपुलावरून वाहने जाताना त्यांना वेगाची मर्यादा आहे. मात्र याकडे वाहनचालक सर्रासपणे दुर्लक्ष करीत असतात. त्या अतिवेगामुळे अपघातत वाढत होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.