नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी करणाऱ्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
फिर्यादी आकाश राजेंद्र मोरे (रा.राजवाडा, पळसे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश मोरे व त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाले. म्हणून आकाश यांच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात मोरेवर शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे जेलरोड नारायणबापू चौक येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले हवालदार बाळासाहेब सोनवणे यांनी आकाश मोरे यांचे वडील रवींद्र मोरे यांना पोलीस ठाण्यात बोलवले. दरम्यान, मी गुन्ह्यात जामीन देण्यासाठी मदत करतो,मला १० हजार द्या, पैसे दिले नाही तर याचा त्रास होईल, ८ डिसेंबरला आकाशाकडे पैसे पाठवून द्या असे सोनवणे म्हणाले, त्यावेळी रवींद्र मोरे यांनी पैशाची व्यवस्था करतो असे सांगितले.
यानंतर सोमवारी (दि.७ डिसेंबर) रोजी रवींद्र मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मंगळवारी (दि.८ डिसेंबर) रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास नारायणबापू चौकातील पोलीस ठाण्यात आकाशकडे सोनवणे यांनी पैशांची मागणी केली. दरम्यान खात्री झाल्यांनतर विभागातील पथकाने सोनवणे यांच्यावर कारवाई केली.