नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील म्हसरूळ भागात २०१३ ते २०१५ या कालावधी दरम्यान, एका महिलेला लग्नाचे आमिष देवून, शारीरिक शोषण करण्यात आले होते. तसेच महिलेला शिवीगाळ करण्यात आली असून, यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीस १३ जानेवारी २०२१ रोजी १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्हा प्लॉट क्रमांक १०, नीलकंठदर्शन अपार्टमेंट, म्हसरूळ येथे घडला आहे. दरम्यान, आरोपी शैलेंद्र अरुण कुलकर्णी (वय ३९, रा. प्लॉट क्रमांक ८ गुरुजन अपार्टमेंट, स्नेहनगर दिंडोरी रोड पंचवटी) याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दिले. तसेच २०१३ ते २४ ऑगस्ट २०१५ या कालावधीत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून, फिर्यादीस लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने दमदाटी करत, महिलेस शिवीगाळ केली. यामुळे फिर्यादीने पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी. पुंगळे यांनी केला असून, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले.
तर, त्यांनी जिल्हा न्यायालय नाशिक येथे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, सदर खटल्याची सुनावणी १३ जानेवारी २०२१ रोजी झाली असून, आरोपीस दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे.