नाशिक (प्रतिनिधी) : शहरात रिक्षाप्रवास करतांना पैसे, मोबाईल व किंमती वस्तू चोरल्या जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे या घटनांमागे एखाद्या टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार कारवाई करत, मध्यवर्ती गुन्हेशाखेने या टोळीला सापळा रचून, दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे ताब्यात घेऊन जेरबंद केले.
२० डिसेंबर २०२० रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रिक्षात प्रवाशी बसवून, त्यांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्याकडून देण्यात आले होते. दरम्यान, उपायुक्त निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, मध्यवर्ती गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळवून, त्यातील विना क्रमांकाची रिक्षा व त्यातील इसमांचा शोध सुरु होता. दरम्यान, ७ जानेवारी २०२१ रोजी पोलीस कॉन्स्टेबल विशाल वाघ व अनिल शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली. सदर संशयित विना क्रमांकाची रिक्षा घेऊन, त्यात प्रवाशी बसवून, पंचवटीकडून त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने जात होते. त्यानुसार, पथकाने तात्काळ सापळा रचून, संशयितांना दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे ताब्यात घेतले.
दरम्यान, यामध्ये संशयित रुपेश कैलास भागवत (वय २६, रा.भद्रकाली), मोईन मेहबूब शहा (वय २२, वडाळागाव), आरिफ सादिक शेख (वय ३४, रा.भारतनगर), नवशाद नजाकत खान (वय २०, टाळकी), या टोळीचा समावेश होता. या टोळीने आणखी ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस उप निरीक्षक महेश शिंदे व पथकाने केली.