नाशिक (प्रतिनिधी): तपोवन भागातील रामटेकडी येथे एका अज्ञात तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आठ दिवसांपूर्वी या मुलीचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आला असावा असा साधारण अंदाज पोलिसांकडून लावला जात आहे. या प्रकरणाचा भद्रकाली पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामटेकडी भागात फिरायला गेलेल्या काही लोकांना त्या ठिकाणी मृतदेह दिसला. तो संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता. त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून हि घटना कळवली. पोलिसांनी घटनेच्या ठिकणी जाऊन पाहणी केली असता ती मुलगी १७ ते २५ वयोगटातील असावी हे पोलिसांच्या निदर्शनास आले. मृतदेह कुजलेला असल्याने या तरुणीची ओळख पटणे शक्य झाले नाही. डोक्यावर जोरदार वार केल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.
शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तपासणीच्या वेळी घटनास्थळी सोनोग्राफीचे अहवाल असलेली फाईल पोलिसांना मिळाली.यावरून मृत तरुणी नाशिकरोड परिसरातील असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. म्हणून पोलिसांनी नाशिक रोड व काही सोनोग्राफी सेंटरमधील सीसीटीव्हीची पाहणी केली. व अजुन इतरही काही माहिती मिळाल्याने हे प्रकरण काही दिवसात उघडकीस येईल.