नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या स्मार्ट सिटी अंतर्गत चालणाऱ्या कामांना आधीच सुरुवात झाली आहे. गोदावरी नदीच्या पात्रातील सिमेंट काँक्रीट काढण्याच्या कामाला चांगली सुरुवात झाली आहे. सध्या हे काम दुतोंड्या मारुती पासून ते गाडगे महाराज पुलापर्यंत सुरु आहे. १४ तारखेला रात्री उशिरापर्यंत रामकुंडाजवळ ट्रायल बोअर घेण्यात आली. हे पाणी ठरवलेल्या अंतराच्या दिड इंचांवरच लागले आहे.
मागील काही महिन्यांपासून दुतोंड्या मारुती ते गाडगे महाराज पुलापर्यंतचे काँक्रीट काढण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना पाच कुंडामधील काँक्रीट काढण्यात आले आहे. यामध्ये अनामिक, दशाश्वमेध, रामगया, खंडोबा व पेशवा या तळांचा समावेश आहे. गोदापात्रातील एकूण १७ प्राचीन जलकुंड व नैसर्गिक पाणीसाठा पुन्हा नव्याने जिवंत करण्याचा यामागचा उद्देश आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार याचिकाकर्ते म्हणून देवांग जानी यांनी महापालिकेला कुंडांची सविस्तर माहिती दिली होती. शहरातून वाहणारे गोदावरी नदीचे पात्र काँक्रीटमुळे लुप्त झाले होते. रामकुंड व आजूबाजूच्या परिसरात जिवंत जलसाठे आहेत कि, नाही यावर बरेच दिवस चर्चा सुरु होती. चर्चेअंती स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाने ठरवले कि, नदीपात्रात जिवंत पाणीसाठा सापडल्यास त्या दृष्टीने विचार करण्यात येईल यावेळी भुजल विकास यंत्रणेच्या अहवालाची मदत घेण्यात आली होती.