नाशिक (प्रतिनिधी) : शहरातली वाढती कोरोना बाधितांची संख्या बघता यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यातच उच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. गणेश उत्सवात मंडप टाकले जातात त्यासाठी उच्च न्यायालयाने नियमावली जारी केली आहे.
मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http:/nmcfest.nmc.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करतांना मंडप उभारण्यासाठी स्थलदर्शक नकाशा, धर्मदाय उपयुक्तांकडील नोंदणी पत्र, पोलीस, वाहतूक आणि अग्निशमन या तिन्ही विभागाकडील न हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक मंडळाचे नाव, पत्ता तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे सादर करावी लागणार आहे.
विभागीय अधिकाऱ्यांमार्फत अर्जांची छाननी केली जाईल. पोलीस शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाकडून न हरकत दाखला मिळाल्यानंतर उत्सवाच्या सात दिवसांपूर्वी प्रमाणपत्र दिले जाईल.