मोठी बातमी! सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्कचा वापर बंधनकारक, मंदिर प्रशासनाचा निर्णय
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाबत दक्षता बाळगण्यासाठी सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी मंदिर ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने घेतला आहे.
मास्क सक्तीचा निर्णय भाविकांसाठी बंधनकारक असणार आहे. मास्क शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचा इशारा विश्वस्थ संस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या करोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे हेतूने मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
नागरिकांनी मास्कचा वापर करावा, मंदिर परिसरात गर्दी टाळावी, सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाने डोके वर काढल्यानंतर राज्य शासनाने सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाची मंदिर प्रशासनाकडून मास्क सक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासह वणीचे सप्तशृंगी गडावर भाविकांना मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या नव्या लाटेने पुन्हा प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून यामुळे जगातील सगळेच देश पुन्हा सतर्क झाले. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना सतर्क राहण्याच्या आदेश दिलेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी याबाबत आढावा घेत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. सध्या तरी मास्क घालणं बंधनकारक नाही. परंतु शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भीय सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळण्याच्या हेतूने आदेशीत केले असल्याने सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडद्वारे भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.