नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कोरोना संदर्भात चुकीची माहिती दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर प्रशासकीय कामकाजासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता सर्वच अधिकारी अधिक गांभीर्याने कामात लक्ष देत आहेत.
‘माझे कुटुंब माझी जबादारी’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सादर केलेल्या माहितीवरून हा सगळा गोंधळ समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिलेली माहिती योग्य नव्हती हे वरिष्ठांच्या लक्षात आले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गंभीर विषयावर चुकीची माहिती दिल्याने वरिष्ठांनी त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे हलगर्जीपणा केल्याचा ठपका रवींद्र शिंदे यांच्यावर लागला आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.