नाशिक (प्रतिनिधी): मांडुळ जातीच्या सर्पाची तस्करी करणारा क्राईम ब्रांचकडून जेरबंद करण्यात आला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश शिंदे यांना आपल्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती, की एक इसम मांडुळ हा दुर्मिळ जातीचा सर्प विकण्यासाठी येणार आहे. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोळे यांना याबाबत माहिती दिली.
खबर मिळाल्याप्रमाणे ही व्यक्ती तपोवन रोड जवळील मेट्रो मॉल जवळ येणार होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला व सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. रमेश वसंत लकारे (वय २५, राहणार: इंदिरा घरकुल कॉलनी, करंजवन, ता. दिंडोरी) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात प्लास्टिकच्या गोणीत एक जिवंत मांडुळ जातीचा सर्प असल्याचे लक्षात आले. या पथकाने या सापाला जप्त करून ताब्यात घेतले आहे.