महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे २१ सप्टेंबरपासून नाशिक दौऱ्यावर
नाशिक (प्रतिनिधी): मिशन कम बॅकचा नारा देत मनसे कडून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहेत. येत्या 21 तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये तीन दिवस पक्षाचा आढावा घेणार आहे..
अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिककडे देखील अनेक पक्षांच्या प्रमुखांसोबतच ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.. यातच मनसेनेदेखील आपला बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी उतरताना दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून, नाशिक मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. ज्यात मनसेचे वरिष्ठ नेते, व राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी चार दिवस नाशिकमध्ये प्रभागातील वॉर्ड प्रमुख पदासाठी इचुक असलेल्यांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेतल्या. त्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील येत्या 21 तारखेपासून नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
तीन दिवस नाशिक मध्ये तळ ठोकून राज ठाकरे हे पक्षाचा आढावा घेणार असून नवीन शाखा अध्यक्षांचा मेळावा देखील घेणार असल्याची माहिती आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार अशी एकूणच चर्चा सध्या नाशिकमध्ये आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघाही नेत्यांनी नाशिक वर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय..!