नाशिक (प्रतिनिधी) : शहरात १ जानेवारीपासून महापालिकेच्या बस रस्त्यावर धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. तरी सुरुवातीला काही ठराविक मार्गांवर प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु करण्यात येईल व पुढे वाढवण्यात येईल.
राज्य परिवहन महामंडळाकडून शहरातील बससेवा परवडत नसल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान महामंडळाकडून गेल्या काही वर्ष्यांमधे हळूहळू बसफेरा देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रवाश्यांची कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त जाधव यांनी मंगळवारी (दि. ४) रोजी महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
दरम्यान नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांमध्ये कोरोनाची लाट येणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. मात्र, वास्तवात जर लाट आली नाही तर, जानेवारीपासून ही सेवा करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहे. बससेवेसाठी बस ठेकेदार निश्चित करण्यात आले आहेत. सीएनजी पंप डिसेंबर पर्यंत सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने महापालिकेला कळवले आहे. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या या जोरदार तयारीमुळे शहरात महापालिकेच्या बसेस लवकरच रस्त्यावर दिसतील अशी शक्यता आहे.