महत्वाची बातमी: नाशिक शहरात चार दिवस पाणी वितरण वेळेत बदल!
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी विभागातील कोणार्कनगर जलकुंभाला आतील बाजूने वॉटर प्रुफिंगचे काम करणे क्रमप्राप्त असल्याने २७ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालवधीत जलकुंभातून पाणीपुरवठा करता येणार नाही.
जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा हा उर्ध्ववाहिनीतून बायपास यंत्रणेद्वारे करावा लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे व पाणी वितरण वेळेत बदल केला जाणार आहे.
कोणार्कनगर जलकुंभावरून पहिल्या टप्प्यात श्रीरामनगर, कोणार्कनगर- १ व २, गणेश मार्केट, बालाजी चौक, मते वस्ती, मेडीकल फाटा आदी परिसरात सकाळी सहा ते साडेसातपर्यंत पाणीपुरवठा केला जातो.
त्याऐवजी २७ जानेवारीपासून सकाळी सहा ते आठपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. सद्यःस्थितीत सदर जलकुंभावरुन दुसऱ्या टप्प्यात नांदूर रोड, लोकधारा सोसायटी, वृंदावननगर, लभडेनगर, दत्तनगर, बर्वे वस्ती, रौंदळ वस्ती, गोकुळधाम सोसायटी, प्रगती सोसायटी आदी परिसरात सकाळी आठ ते साडेनऊ या कालावधीत पाणीपुरवठा केला जातो.
त्याऐवजी २७ जानेवारीपासून संध्याकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत पाणी वितरित केले जाणार आहे. या कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. जलकुंभाचे दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर पाणी वितरणाची वेळ पूर्ववत होईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790