नाशिक (प्रतिनिधी) : भावाने बहिणीला अमिष दाखवून हक्कसोड पत्र करून घेतले होते. आता भाऊ तिचे पालन-पोषण करण्यास तयार नाही. म्हणून आई, वडील व वरिष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ या कायद्यातील कलम २३ अन्वये जिल्हाधिकारी तसेच दंडाधिकाऱ्यांनी हे हक्कसोड पत्र रद्द केले आहे.आजवरचा अशा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच आदेश आहे.
या आदेशानुसार कुटुंबातील तसेच नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडेल. असा दावा जिल्ह्याधिकारी सुरज मांढरे यांनी केला आहे. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींची काळजी व जबाबदारी घेणे बंधनकारक असल्याचेही मांढरे म्हणाले. एका अर्जदार निराधार बहिणीला पालनपोषणासाठी दरमहा अन्न, वस्राची रक्कम देण्याचे आदेश भावाला दिले होते. मात्र, त्याच्याकडून याची पुर्तता झाली नाही. या आदेशावर अर्जदार बहिणीच्या भावाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केली होती. त्या अपीलाच्या सुनावणीवेळी भावाला संधी देण्यात आली.पण त्यांने बहिणीची जबाबदारी स्वीकारली नाही. सुरवातीला भावाने बहिणीशी गोड बोलून तसेच चांगले वागून भविष्यात तिला सांभाळण्याचे आमिष देऊन, वडिलोपार्जित शेतमिळकतीचे हक्कसोडपत्र करून घेतले होते.
त्यानंतर तिच्या पालन-पोषणाला नकार दिला.ही बाब समोर आल्याने आई,वडील व वरिष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७च्या कलम २३ अन्वये प्राप्त अधिकारात भावाने बहिणीची फसवणूक करून हक्कसोड पत्र करून घेतले ते रद्द करून, सातबारा उतारे देखील दुरुस्ती करण्याचे आदेश मांढरे यांनी दिले आहेत आणि एका निराधार बहिणीला मदत केली. अशी कोणाची फसवणूक झाली तर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज करावा असे आवाहन देखील जिल्ह्याधिकारी यांनी केले आहे.