नाशिक (प्रतिनिधी) :आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे, अशा खेळाडूंचे अनुभव येणाऱ्या भावी खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरतील. या दृष्टिने तसेच भावी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेवून जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात यावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्या आहेत.
शासनाच्या क्रीडा धोरणानुसार नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा संकुलासाठी जिल्हा परिषदेकडून करार पध्दतीने जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर वापरण्या योग्य नाही, असे बांधकाम काढून त्याजागी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेवून आर्कीटेक्चर व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनाने इनडोअर व ऑऊट डोअर खेळांच्या अनुषंगाने सर्व क्रीडा विषयक आवश्यक सोयी सुविधा खेळाडूंना उपलब्ध होण्याच्या दृष्टिने क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करावा. सर्व समावेशक असा क्रीडा संकुलाचा नवीन आराखडा येत्या 15 दिवसांत तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले आहेत.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या अनुषंगाने खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांसाठी सुविधायुक्त अशा प्रेक्षक गॅलरीची क्षमता वाढविण्यावर देखील लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. क्रीडांगण, कॅफेटेरिया, प्रशासकीय इमारत, खेळाडूंच्या मुलभूत गरजा असलेल्या या बहुद्देशिय जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना सध्या उपलब्ध निधीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा आणि त्यानुसार आराखडा तयार करून कामास सुरूवात यावी, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.