नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील अंबड भागात २ मैत्रिणी सायकल चालवत होत्या. दरम्यान, एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला. त्याने एका मुलीसोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २२ डिसेंबर) रोजी फिर्यादी व तिची मैत्रिण सायकल चालवण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. दरम्यान, अंबड भागातील कोशिको नगर येथील युफोरिया जिम समोरून या दोघी मैत्रिणी जात असतांना एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला. तो इसम ज्या दुचाकीवर आला होता; त्या दुचाकीची नंबर प्लेट कपडयाने झाकली होती. या इसमाने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन, महिलेच्या पार्श्वभागावर हाताने जोरात चापट मारून, विनयभंग केला. यानंतर संशयिताने सी.टी. सेंटर मॉलच्या दिशेने पोबारा केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.