नाशिक (प्रतिनिधी) : नायलॉन मांजा शहरातील विक्रेत्यांकडून सर्रास विकला जात असल्याची माहिती समोर आली होती. तसेच नायलॉन मांजामुळे गळा कापला जाणे, मृत्यू होणे या घटना देखील वारंवार घडत होत्या. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्याचे सत्र सुरु झाले असून, ही ६ वी कारवाई आहे. त्यानुसार, भद्रकाली परिसरात एक इसम नायलॉन मांजा विक्री करतांना आढळून आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून, (दि.११ जानेवारी) रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास खतीब डेअरीच्या बाजूला, दुधबाजार, भद्रकाली येथे जाऊन खात्री करण्यात आली. दरम्यान, जितु दत्तात्रय भोसले (वय २७, रा.तिवंधालेन, भद्रकाली) हा नायलॉन मांजा विक्री करतांना आढळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून, ५३ हजार किमतीचा हिरो प्लस, मोनो काईट, गोल्ड या नावाचे नायलॉन मांजाचे ४९ गट्टू जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी पुढील तपास करीत आहेत. यापूर्वी भद्रकाली पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर ४ कारवाया करण्यात आल्या होत्या. दरम्यान, त्यांच्याकडून, एकूण १ लाख २८ हजार किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी इत्यादींनी केली.