नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नांदूरगाव भागात अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या ७ वर्षीय बालकाची, आईच्या प्रियकराच्या हातून हत्या झाल्याची घटना समोर आली. हि घटना २१ डिसेंबर रोजी घडली असून मृत मुलाच्या आईला व तिच्या प्रियकराला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मृत मुलाच्या आईने मुलगा अंगणात खेळत असताना जखमी झाल्याचे सांगून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृत्यूचे खरे कारण समोर आले. संबंधित मृत मुलाचा संशयित योगेश वसंत कुह्राडे (वय.२२, रा. साईनगर, नांदूर नाका) याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे समोर आले. हा प्रकार मृत मुलाच्या आईला माहित असताना देखील तिने हे लपवून ठेवल्याचे पुढे आल्याने याप्रकरणात संशयितासह मुलाच्या आईला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली होती. त्यानुसार दोघांना ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.