नाशिक: ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकाकडून ग्राहकालाच १३ लाखांचा गंडा
नाशिक (प्रतिनिधी): बँक व्यवस्थापकाने ग्राहकांना दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे आमिष देत ग्राहकाच्या बँकेतील ठेवी काढून घेत १३ लाख ८० हजारांचे आर्थिक नुकसान करत फसवणूक केल्याचा प्रकार अमृतधाम येथील अॅक्सिस बँकेत उघडकीस आला.
याप्रकरणी संशयित बँक मॅनेजर अमित दिलीप कुलकर्णी यांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि राजेंद्र जाधव (रा. मेडिकल फाटा, आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ ते २०२१ या कालावधीत अॅक्सिस बँकेच्या अमृतधाम शाखेत जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या नावे १३ लाख ८० हजारांची रक्कम असल्याचे बघून संशयित बँक मॅनेजर अमित कुलकर्णी यांनी खात्याची माहिती घेत जाधव आणि इतर साक्षीदारांना बोलवून घेत त्यांच्या खात्यातील रक्कम तुम्ही दुसऱ्या बँकेत गुंतवणूक करा, त्यावर अधिक प्रमाणात व्याज मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. बँकेचे सह्या केलेले कोरे चेक घेऊन त्याद्वारे जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार जाधव यांनी पोलिसांना दिली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.