नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या स्मारकाची झालेली दुरवस्था पालटणार आहे. त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
नाशिककरासाठी पर्यटनाचे केंद्र असलेले दादासाहेब फाळके स्मारकाची स्थापना १९९९ -२००० च्या कालावधीत करण्यात आली. त्यावेळी महत्वाचे आकर्षण ठरलेले संगीत कारंजे उद्यान सुरुवातीला पालिकेला चांगले उत्पन्न मिळून देत होते. परंतु महानगरपालिकेने स्मारककडे दुर्लक्ष केल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांनी स्मारककडे पाठ फिरवल्याने तेथून महापालिकेला उत्पन्न कमी झाले. महपौर सतीश कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्मारकाची पाहणी केली आणि त्यानंतर स्मारकाचे स्वरूप बदलण्याचा विचार सुरु केला आहे. महापौर कुलकर्णी यांनी अगोदर पाहणी केली त्यावेळी नूतनीकरणाच्या सूचना कला क्षेत्रातील विचारवंतांच्या माहिती प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पाच कोटीची तर फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक या दोघांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात करण्याची सूचना केली आहे.