नाशिक (प्रतिनिधी): आनंदवली येथील रमेश मंडलिक खूनप्रकरणी मोक्का लावण्यातत आलेला भूमाफिया रम्मी राजपूत याच्यासह सचिन मंडलिक या दोघांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकान्वये दिली आहे.
या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजपूत आणि सचिन मंडलिक तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत आहेत. दोघांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्ती करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदवली येथील रमेश मंडलिक यांचा सुपारी देऊन खून करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार सचिन त्र्यंबक मंडलिक याने कट रचून अक्षय मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रेय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भडांगे, भगवान चांगले, बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, रम्मी राजपूत, मुक्ता मोटकरी यांनी कट रचून रमेश मंडलिक यांचा गळा चिरून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का कायद्यांतर्गत मुख्य सूत्रधार मास्टरमाइंड रम्मी राजपूत, सचिन मंडलिक आणि वरील संशयितांसह गोकुळ आव्हाड, अमोल कालेकर, सिद्धेश्वर अंडे, दत्तात्रेय सुरवाडे, नारायण बेंडकुळे अशा २० संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.