नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांवर शस्त्रांचा धाक दाखवून सर्रासपणे सामान्य माणसांच्या लुटीचे प्रकार घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून कंबर कसण्यात आली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आदेशावरून, गुरुवारी (दि.१० डिसेंबर) रोजी पहाटे साडेतीन ते ७ वाजेच्या दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत शहरातील सराईत गुन्हेगारांच्या राहत्या घरांवर छापे टाकण्यात आले. दरम्यान, ६ संशयित आरोपींकडे प्राणघातक हत्यारे आढळली.
पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्य्क पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या १० टीम तयार केल्या. त्यानुसार, ज्या सराईत गुन्हेगारांवर घातपाताचे, दरोडे टाकणे, प्राणघातक हत्यारे बाळगल्याचे, खुनाचे, गंभीर गुन्हे दाखल असतील त्यांच्यावर या टीम कडून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान श्याम लक्ष्मण महाजन (रा.हिरावाडी, पंचवटी) याच्या घरातून १ तलवार व सुरा आढळून आला. तर किरण सुकलाल गुंजाळ (रा.नवनाथनगर, पंचवटी) याच्या घराची झडती घेतली असता, २ कोयते मिळाले. तसेच गोकुळ मधुकर येलमाने (रा.फुलेनगर, पंचवटी) याच्या घरातून १ चॉपर मिळाला. रोशन केशव चव्हाण (रा.पंचवटी) याच्या घरातून १ धारधार कोयता आढळून आला. पप्पू उर्फ प्रकाश मोहन धोत्रे (रा.पेठरोड, पंचवटी) याच्या घराच्या झडती दरम्यान १ कोयता व १ चॉपर मिळाले. तर केतन अशोक थोरात (रा.हिरावाडी, पंचवटी) याच्या घरातून १ लोखंडी फायटर हे प्राणघातक हत्यार मिळाले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.