नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत रामचंद रामपराग निषाद यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी ताबडतोब चक्रे फिरवून आरोपींना अवघ्या पाच तासात अटक केली आहे.
गुरुकृपा कार सर्व्हिस गॅरेज, मेटोझोनच्या समोर, वडाळापाथर्डी रोडवर रामचंद रामपराग निषाद, वय ३७ वर्षे, याचा डोक्यावर काहीतरी हत्याराने मारून त्याचा खुन झाला होता. याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह घटनास्थळाला भेट देवुन माहिती घेतली. सदर माहिती वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कळविली. व सदर मयताबाबत माहिती घेतली असता दोन महिन्यांपासुन त्यांचेकडे काम करणारा त्यांचा एक कारागीर रोशन सुभाष कोटकर, रा. येवला हा चार ते पाच दिवसापासुन गावाला निघुन गेल्याचे व त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असल्याचे समोर आले.
तसेच सदर गॅरेज मधुन दुरुस्तीसाठी आणलेली एक हुंदाई व्हर्ना गाडी सुध्दा गायब असल्याचे दिसुन आल्याने त्याबाबत शोध घेणेबाबत नियंत्रण कक्षामार्फत सर्व पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती. परिमंडळ २ चे पोलीस उपयुक्त विजय खरात यांनी सहायक पोलीस आयुक्त विभाग ३ समीर शेख यांना सदर तपासाबाबत सुचना केल्या. त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष खडके, अंबड पो.स्टे.चे पोउनि राकेश शेवाळे, यांची पथके तयार करून प्रत्येकाला वेगवेगळया मुददयांवर मार्गदर्शन केले. ज्यामुळे गुन्हयातील संशयित आरोपीत रोशन सुभाष कोटकर व महेश भगवान लभडे दोघे रा. निमगावमढ, चिोंडीरोड, ता. येवला, जि. नाशिक यांना येवला येथे जावुन तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी या खुनाची कबुली दिली. तसेच खुन करून पळुन जाताना गॅरेज मधुनच घेवुन गेलेली व्हर्ना कार ही सुध्दा माडसांगवी येथे आरोपीनी बेवारस सोडल्याचे दिसुन आल्याने ती तपासकामी ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर मयताचे अनुषंगाने सखोल विचारपुस करून एका तासातच संशयित आरोपी निष्पन्न करून त्याच प्रमाणे कौशल्याने तपासात करून चार ते पाच तासातच आरोपी यांना तपासकामी ताब्यात घेवुन चौकशी अंती गुन्हयात अटक करण्यात आली आहे.