नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला अज्ञात इसमाने व्हॉटसअपवर संपर्क केला. दरम्यान, परदेशात शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे मिळवून देण्याचे आमिष देत, विश्वास संपादन केला. त्यानंतर, संशयिताने तरुणाकडून वेळोवेळी असे एकूण ७ लाख रुपये उकळले.
सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी, राजेंद्र गोविंद सोनवणे (वय ३१) हे सिद्धकला मराठा नगर, राजराजेश्वरी मंगलकार्यालयाजवळ, जेलरोड परिसरात राहतात. दरम्यान, एका अज्ञात इसमाने त्यास (दि.२१ नोव्हेंबर २०२०) रोजी व्हाट्सअपवर +४४७५७६४७२५५१ व +४४७४३८८३४१६३ या क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच इसमाने (दि.२ डिसेंबर २०२०) पर्यंत वारंवार फोन करून, फिर्यादीस जर्मनी येथे उच्चं शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले IELTS परीक्षेचे सर्टिफिकेट व आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याचे आमिष दिले. दरम्यान, इसमाने तरुणाकडून एकूण ७ लाख ६ हजार ८३८ रुपये उकळले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.