नाशिक: हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार

नाशिक (प्रतिनिधी):  वसतिगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिमध्ये घडला आहे. याप्रकरणी, संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी (पो. सामुंडी) येथील सर्वहरा परिवर्तन केंद्रात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी व छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. मुलींनीच पालकांकडे ही तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

मुलींनी तक्रार करताच पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच, घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.

संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल आहे. तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जाते, असा आरोप वसतिगृहातील मुलींनी केला आहे.

नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुलींना घरी आणत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक (रा. राणेनगर, नाशिक) आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी फिर्याद दिल्याने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

ह्या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संशयित आरोपी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत. या घटनेचा संपूर्ण तपास नासिक ग्रामीण उपअधिक्षक सुनील भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती मधे यांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक व तेथील शिक्षिकांनी फेटाळून लावला आहे. आरोपांबाबत एका शिक्षिकेने सांगितले आहे की, आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना कदाचित पर्यटक ते पाहत असतील. असं स्पष्टीकरण शिक्षिकांनी दिलं.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790