नाशिक: स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे टवाळखोरांचा धुडगूस
नाशिक (प्रतिनिधी): येथील महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात काल संध्याकाळी काही विध्वंसक तरुणांच्या टोळक्याने हुल्लडबाजी करून बाथरूममधील शॉवर, नळ यांच्यासह खिडक्यांच्या काचांचीही मोडतोड केली.
काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही किशोरवयीन तरुणांनी एक दिवसाचे पोहण्याचे शुल्क भरून आत प्रवेश करत तलावात गोंधळ घातला.
जलतरण तलाव परिसरातील आंब्याच्या झाडावर चढत कैऱ्या पाडल्या तर काही कैऱ्या तलावात फेकून दिल्या.
इतकेच नव्हे तर सुरक्षा रक्षकाने त्यांना शांत राहण्याचे आवाहन करूनही त्यांनी पोहोताना एक दुसऱ्याला पाण्यात दाबून ठेवण्याचे प्रकार करत गोंधळ सुरूच ठेवला.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10523,10519,10511″]
शेवटी काही सुरक्षा राक्षकांनी त्याना शांत रहा असे सांगितल्यानंतर हा गट त्यांच्याच अंगावर धावून गेला आणि त्यांच्या पैकी काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने बाथरूम मधील नुकतेच दुरुस्त केलेले शॉवरचे नळ, पाईपची तोडफोड केली. दरम्यान, याबद्दल तलावाचे व्यवस्थापक आर.पी. काटे यांनी सुरक्षेसाठी पोलिसाकडे कुमक द्यावी अशी मागणी करणारे पत्र दिले.
काल आ.देवयानी फरांदे यांनी तलावाची पाहणी करून तेथील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्याशी सवांद साधला आणि लवकरच आमदार निधीतून तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही दिली.
कुठलेही कारण नसताना केवळ हुल्लडबाजी, मस्ती म्हणून केलेल्या या घटनेचा येथे पोहोण्यासाठी नियमित येणाऱ्या नागरीकांनी तीव्र शब्दात निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या प्रकारानंतर शुक्रवारी तलाव पोहण्यासाठी बंद करण्यात आला होता. तलावात तरुणाच्या टोळक्याने धुडगूस घालून तोडफोड केली ही घटना अत्यंत वाईट आहे. २ वर्षानंतर आता कुठे नाशिककरांना तलाव पोहोण्यासाठी उपलब्ध झाला आणि त्यात ही घटना घडली. आमदार निधीतुन परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पावलं उचलणार आहे.