नाशिक: सासऱ्यावर होणारा कोयत्याचा वार सुनेनं झेलला; हल्लेखोरास अटक
नाशिक (प्रतिनिधी): न्यायालयात दाखल असलेली केस मागे का घेत नाही, या कारणावरून सासऱ्यावर होत असलेला कोयत्याचा वार सुनेने स्वतःच्या अंगावर झेलला.
सुनेने दाखवलेल्या या प्रसंगावधानमुळे सासरा बचावला असून सुनेच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी युवकास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसला मिलिटरी स्कूलमागील संत कबीर नगरमधील बौद्ध विहाराजवळ शनिवारी रात्री हा प्राणघातक हल्ला झाला. यात स्वाती सुमेद वाघमारे (वय २२) व विजय शशीराव वाघमारे (रा. संत कबीरनगर) हे दोघे जखमी झाले आहेत.
स्वाती सुमेद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हल्लेखोर अमन दयाळ जाधव (वय २१) याची आई स्वाती व विजय वाघमारे यांच्याशी कोर्टातून केस का मागे घेत नाही या कारणावरून बाचाबाची करीत होत्या. त्यावेळी अमन हा कोयता घेऊन आला व विजय वाघमारे यांच्यावर हल्ला करण्याच्या बेतात होता.
- नाशिक: बाथरूमच्या गिझर मधून गॅस गळती झाल्याने तरुणीचा गुदमरून मृत्यू
- दुर्दैवी: विवाह समारंभ आटोपून नाशिकला परतणाऱ्या आयशरला अपघात; नाशिकच्या चार जणांचा मृत्यू
हे पाहून स्वाती हिने सासऱ्यावर होत असलेला कोयत्याचा वार स्वतःच्या अंगावर झेलला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अमनने दुसरा वार विजय वाघमारे यांच्यावर केला. त्यात त्यांच्या बोटाला इजा झाली. स्वाती वाघमारे यांच्या तक्रारीन्वये गंगापूर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ३०७, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून अमन जाधव यास अटक केली आहे. सहायक निरीक्षक एन.व्ही. बैसाणे पुढील तपास करत आहेत.