नाशिक: सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकला पाचशेची लाच घेताना अटक
नाशिक (प्रतिनिधी): वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्याने त्याची नोंद करून वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्यातच अटक केली.
मधुकर दत्तू पालवी (४२) असे संशयित लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वाहनाचे कागदपत्र गहाळ झाले होते. सदरची कागदपत्रांची नोंद गहाळ वहीमध्ये करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी लाचखोर पालवी याने तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
विभागच्या पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्यच्या आवारातच सापळा रचला आणि गुरुवारी (ता.२२) दुपारी ५०० लाचेची रक्कम घेताना पालवी यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संदीप घुगे हे तपास करीत आहेत.