नाशिक: शिक्षण विभागातील लाचखोर वरिष्ठ सहाय्यक जाळ्यात

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांसह अनेक छोठे-मोठे कर्मचारी लाच घेताना पकडले आहेत. या घटना ताज्या असतानाच आज येथे पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटना व त्यावर होणारी चर्चा ताजी असतानाच पुन्हा येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागात लाचेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे.

सायंकाळी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाला दोन हजारांची लाच घेताना पकडले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून, येथून बाहेर बदली झाल्याने त्यांचे व त्यांच्या पत्नीचे अंतिम देयक तयार करून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीतील वरिष्ठ सहाय्यक संजय पाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले आहे.

बदलीनंतर हक्काने मिळू शकणाऱ्या कागदासाठी दोन हजार रुपये मागितले जात असल्याने वैतागलेल्या संबंधित उपशिक्षकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचला होता.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

या सापळ्यात शहरातील टपाल कार्यालयासमोर दोन हजार रुपये लाच स्वीकारताना पथकाने पाटील यांना पकडले आहे. वरिष्ठ सहाय्यक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर मोरे, दीपक पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर करीत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

दरम्यान, मागील महिन्यात १० मेस गाय गोठ्याच्या फायलीवर सही करण्यासाठी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

या घटनेनंतर दुसरी घटना मागील आठवड्यात घडली होती. ३ जूनला एका पोलिसाला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर महिन्यातच तिसरी घटना घडल्याने पंचायत समितीसह शासकीय कार्यालयातील कारभाराची चर्चा रंगत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790