नाशिक शहर: पंधरा लाखांची खंडणी मागणाऱ्या आपच्या कथित कार्यकर्त्यावर गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आपच्या कथित कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संशयित काही दिवसांपासून अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याची धमकी देत असल्याची तक्रारही नगरसेविकेच्या पतीने पोलिसांत केली आहे.
अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मी नगर, हिरावाडी, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि धनंजय माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माने भाजपचे पदाधिकारी आहेत.
त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी प्रभागात नेतृत्व केले आहे. काही दिवसांपासून संशयित अनिकेत निकाळे याने पंचवटी पोलिस ठाण्यासह पोलिस आयुक्तालय, सहायक आयुक्त कार्यालयात खोटे तक्रार अर्ज केले होते. त्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही नमूद केले होते. माने यांनी पोलिस ठाण्यात जबाबही लिहून दिला आहे. तरी देखील संशयिताने पोलिसांत पुन्हा अर्ज देत तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा लाखांची खंडणी मागितली. तडजोडअंती सात लाख आणि एका व्यक्तीला मनपामध्ये नोकरी अशी मागणी केली. संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून रकमेची मागणी केली. माने यांनी वाद मिटवण्यासाठी एका बँकेतून ५० हजारांची रक्कम काढून संशयिताला दिली. मानेंनी याचे चित्रिकरण करुन हा पुरावा पोलिसांना दिला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक डॉ.. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.