नाशिक (प्रतिनिधी): शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहेत म्हणून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत मात्र त्यांचा फारसा फायदा होताना काही दिसत नाहीये. त्या उपयांमध्ये भर म्हणून शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे ठरवण्यात आले होते. त्याला आता कित्येक वर्षे उलटून गेली तरी अजून काही मुहूर्त लागलेला नाही,
हा निर्णय कुंभमेळ्यादरम्यान घेण्यात आला होता. या गोष्टीला जवळ जवळ पाच वर्षे उलटली आहेत. तरीही त्यावर ठोस असे काही केल्याचे अद्याप आढळून आलेले नाही. कंट्रोल रूम अद्ययावत केलेल्या पोलिसांना सीसीटीव्हीची प्रतीक्षा आहे. स्मार्ट सीटी कंपनीकडून वेगवान कामाची गरज असल्याचे म्हटले जात आहे. शहरात रोज गुन्ह्यांची नोंद वाढत असून वाहनचोरी, सोनसाखळी चोर हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या गुन्ह्यांचा तपास करतांना पोलिसांना आजही अस्थापनांमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हींवर अवलंबून राहावे लागते. कुंभमेळ्यादरम्यान शहरामध्ये कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीने जोर धरला होता व तिला मान्यताही मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात त्यावर काही प्रगती झाली नाही. त्यामुळे आता नागरीकांसोबतच पोलीस प्रशासन सुद्धा सीसीटीव्हीच्याच प्रतीक्षेत आहेत.