नाशिक शहरात पावसाची हजेरी, त्र्यंबकेश्वरला काही मिनिटांत रस्ते पाण्याखाली…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरांसह जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह वादळी वारा वाहत होता.
अशातच नाशिक शहरात पावसाला सुरुवात झाली, त्र्यंबकेश्वरसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे चाकरमान्यांसह नागरिकांची धावपळ उडाली आहे. एकीकडे रविवारच्या सुट्टीचा बेत आखत असलेल्या नाशिककरांवर पावसाने विरजण पाडले आहे.
नाशिकमध्ये आज उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी जाणवत होता. सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पावसाला सुरवात झाल्याने नागरिकांना गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर प्रचंड उकाड्याने शहर व जिल्हावासीय हैराण असून मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अशातच आज सकाळपासून वातावरणात बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही क्षणात पावसाला सुरवात झाली. यात त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.
ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वाढलेला वेग यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला. नाशिकमध्ये तीन अंशाने तापमान घसरून 35.8 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आज सकाळपासूनच ढगाळ हवामान वादळी वारा वाहत होता. अशातच साडेअकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.
साधारण दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली, मात्र त्र्यंबकेश्वर शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावून नागरिकांसह पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच आज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पायी दिंडी पालखी सोहळा नाशिक शहरात दाखल झाला असून पावसामुळे वारकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान नाशिक शहरात पावसाने उघडीप दिली असली तरीही अद्याप ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट सुरु आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तास पाऊस येण्याची चिन्हे आहेत.
त्र्यंबकेश्वरला जोरदार पाऊस:
आज सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी वारा वाहत होता. त्यामुळे पाऊस येणार असल्याची चिन्हे दिसतहोती. अशातच साडे अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे. दिसून आले. नुकतेच त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. त्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत.
![]()
