नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: वीज बिल भरण्याचा बनाव करून अॅपद्वारे सव्वादोन लाखांची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): वीज बिल भरण्याचा बनाव करून ग्राहकास अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे पासवर्ड मिळवून त्याद्वारे 2 लाख 13 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सबा कौसर मोहम्मद वसिम शेख (वय 35, रा. दीप रेसिडेन्सी, अशोका मार्ग, हॅपी होम कॉलनी, नाशिक) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
फिर्यादी शेख यांना अज्ञात इसमाने दि. 17 जानेवारी 2023 रोजी वीज बिल भरण्याचा बनाव करून संपर्क साधला. वीज वितरण कंपनीची ओळख धारण करून या अज्ञात इसमाने फिर्यादी यांना टीम व्ह्युअर नावाचे रिमोट अॅक्सेस अॅप डाऊनलोड करावयास सांगितले.
त्यानुसार शेख यांनी हे अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर या अॅपच्या सहाय्याने अज्ञात इसमाने फिर्यादीच्या फोनचा अॅक्सेस प्राप्त केला. त्यानंतर इंटरनेट बँकिंगचा आयडी व पासवर्ड मिळवून 2 लाख 13 हजार 499 रुपये एवढी रक्कम काढून शेख यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.
ही बाब लक्षात आल्यानंतर शेख यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.
![]()
