
नाशिक: रिंग रोडवरून जातांना दुचाकीस्वारास तिघांनी लुटले; सोन्याची चैन खेचून फरार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये अजूनही लुटमारीच्या प्रकारांना ब्रेक लागलेला नाही.
दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढच होतांना दिसून येतेय.
अशातच रिंग रोडने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना समोर आलीये.
दुचाकी वरून आलेल्या तिघांनी एकाला मारहाण करत त्यांच्याकडून सोन्याच्या चैनीसह रोख रक्कम हिसकावत घटनास्थळावरून पलायन केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पराज रमेश भोसले ( वय: ३९,रा. प्लॉट नंबर १९८, सुविश्वास रो हाउस,सिद्धिविनायक टाऊनशिप त्रिकोणी बंगला पंचवटी,नाशिक) हे त्यांचे दुकान बंद करून घरी जात असतांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास कळसकर नगर येथे त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकी वरून आलेल्या तिघांनी त्यांच्या गाडीला आडवे होऊन त्यांच्याशी हुज्जत घातली.
त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत भोसले यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांची सोन्याची चैन व २ हजार ७०० रूपये रोख असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक कासरले करीत आहेत.