जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकच्या सातपूर भागात रविवारी रात्रीच्या सुमारास स्वीट दुकानाला आग लागल्याने, दुकान पूर्णपणे जळुन खाक झाले आहे. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
सातपूर श्रमिक नगर येथील गायत्री स्वीट ह्या दुकानाला रविवारी (दि. २८ मार्च) रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठं भीतीच वातावरण पसरले होते, चिंतेची बाब म्हणजे ह्या दुकानाच्या पोटमाळ्यावर दुकानातील 5 कामगार झोपलेले होते. त्यांनी देखील तात्काळ दुकानाबाहेर धाव घेऊन स्वतःचा जीव वाचवला, तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ धाव घेत दुकानात असलेले 5 सिलेंडर बाहेर काढण्यात आले.
त्याच बरोबर अग्निशमन विभागाला आगी बाबत कळविले असता अग्नीशमन विभागाचे कर्मचारी आणि सातपूर पोलिस यांनी घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग इतकी भयंकर होती की मोठे मोठे आगीचे लोळ बाहेर पडताना दिसून येत होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ह्या आगीवर नियंत्रण मिळवल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
ह्या घटनेत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येतेय. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.