नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील महापालिकेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागली असून, मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन विभागाने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. तसेच नाशिक दौऱ्यावर असलेल्या उच्चं व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी महापालिकेच्या इमारतीला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, आगीचे मोठे कल्लोळ आणि धूर बाहेर पडताना दिसून येत होते. ही आग महापालिकेतील शिवसेना गटनेता कार्यालय व विरोधी पक्षनेते कार्यालय या ठिकाणी लागली. दरम्यान, उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन, महापालिकेचे फायर ऑडिट कधी झाले हे जर अधिकाऱ्यांना माहित नसेल तर ही गंभीर बाब असून, राज्यातील इतरही नगरपरिषद व महापालिकेच्या फायर ऑडिट संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असे ते म्हणाले.
तसेच ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाचे अधिकारी व पथक तातडीने घटनास्थळी पोहचले व आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, खुर्ची, टेबल, सोफा, इत्यादी साहित्य आगीत जळून खाक झाले. तर, भीषण आगीमुळे कार्यालयातील वायरिंग, कपाट व पंखे वितळल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर, दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची तात्काळ चौकशी व दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे. त्यानुसार, संजय घुगे (शहर अभियंता, बांधकाम), एस.एम.चव्हाणके (अधीक्षक अभियंता, विद्युत व यांत्रिकी), संजय बैरागी (मुख्य अग्निशमन अधिकारी) यांच्या अंतर्गत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याबाबत ३ दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले आहे